कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी खासगी तसेस सरकारी संस्थाकडून मदतीचे हात पुढे येऊ लागले आङेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पंतप्रधान सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. सीआरपीएफकडून ३३ कोटी ८१ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. जगभरात कोरोनाने हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे देश ठप्प झाला असला तरी कठोर निर्णयानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूमुळे देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे. देशातील गरिब आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांसमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार आवश्यक ती मदत पुरवण्याठी प्रयत्नशील आहे. केंद्राकडून विविध पॅकेजची घोषणा करुन देशवासियांना दिलासा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष एकत्रित मिळून कोरोनाशी लढा देताना दिसत आहेत.
सामाजिक संस्था, सरकारी- निमशासकीय आणि खासगी कंपन्या देशावरील संकट कमी करण्यासाठी मदतीचा हातभार लावताना पाहाला मिळत आहे. देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक संस्था आपपल्या परिने प्रयत्नशील आहे.
देशातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परिस्थितीमध्ये जैसे थे राहिली किंवा वातावरण आणखी गंभीर असेल तर यामध्ये आणखी काही कठोर पावले सरकार उचलू शकते. ही वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करणे अपेक्षित आहे.