करोना व्हायरसची जलदतगतीने चाचणी करण्यासाठी दक्षिण कोरिया स्थित कंपनी हरयाणा मानेसरमध्ये रॅपिड टेस्टिंग किटसची निर्मिती करणार आहे. दक्षिण कोरियातील भारतीय दूतावासाने मंगळवारी टि्वट करुन ही माहिती दिली. चीनमधून मागवण्यात आलेले काही रॅपिड टेस्टिंग किटस सदोष निघाले आहेत. तीन राज्यांनी या किटसबद्दल तक्रारी केल्या आहेत.
करोना चाचणीचा अचूक निदान होत नसल्याचे या राज्यांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर ही दिलासा देणारी बातमी आहे. करोना व्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये या रॅपिड टेस्टिंग किटसचे वितरण करण्यात आले आहे. “एसडी बायोसेन्सर या बायो डायग्नॉस्टिक कंपनीने मानेसर येथील प्रकल्पामध्ये उत्पादन सुरु केले आहे. आठवडयाला पाच लाख किटसची निर्मिती येथे करण्यात येईल” अशी माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.
या कंपनीचे प्रमुख यंग-शीक चो यांनी भारतीय राजदूत श्रीप्रिा रंगनाथन यांच्याबरोबर चर्चा केली आहे असे दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.दक्षिण कोरियाने सर्वाधिक चाचण्या करुनच करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले. भारतात १८ हजारपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आहेत. जगभरात २४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. १ लाख ६५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक २ लाख ३० हजार करोना रुग्ण आहेत. तिथे आतापर्यंत ४२ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.