महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील रुग्णांपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई मनपाच्या हद्दीत आहे. महामारी कायद्यानुसार मनपा हद्दीत पालिका आयुक्तांना असलेल्या अधिकाराचा वापर करुन आयुक्त प्रविण परदेशी यांनी मुंबई मनपाच्या हद्दीत दारू विक्री बंद केली. आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवार, 6 मे पासून मुंबई मनपाच्या हद्दीत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. नागरिकांना फक्त किराणा माल, दूध, भाजी, इतर अत्यावश्यक वस्तू, खाण्यापिण्याचे पदार्थ (अन्न-पाणी), औषधे यांची खरेदी करता येणार आहे. इतर वस्तू विकणाऱ्या दुकानांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान बीएमसीच्या इतर दुकाने बंद करण्याच्या निर्णयाचा फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोशिएशनकडून विरोध करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहून इतर दुकाने सुरु करण्याला परवानगी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. असोशिएशनचे अध्यक्ष वीरेश शाह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी सवलत दिल्यानंतर बीएमसीची ऑर्डर पाहून आम्ही दुकानदार आश्चर्यचकित झालो आहोत. आमच्या संघटनेने किंवा सदस्यांनी कधीही सवलत देण्याबाबत मागणी केली नाही. परंतु सरकारने अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी दारुची दुकानं सुरु करण्याचा उत्तम पर्याय निवडला होता.