वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलगा तीन दिवस मृतदेहाच्या शेजारी बसून होता. अखेर फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यावेळी घरातील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजलं. वस्त्रपूर पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुलगा वडिलांच्या मृतदेहाच्या शेजारी बसलेला होता. अहमदाबादच्या गुरुकूल भागामध्ये ही दुर्देवी घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
मुलाचे वय ४० असून तो मनोरुग्ण आहे. आपल्या वडिलांचा मृत्यू झालाय हे त्याला समजलचं नाही. नेमकं काय घडलय हेच त्याला समजत नव्हते. ‘मृत व्यक्तीची पत्नी मुंबईला गेली आहे. लॉकड़ाऊनमुळे वाहतुकीची व्यवस्था नसल्याचे ती तिथेच अडकली’ असे पोलिसांनी सांगितले.
शेजाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या मुलीला कळवल्यानंतर ती लगेच घटनास्थळी पोहोचली. वयोमानानुसार वडिलाना वेगवेगळे आजार असल्याचे तिने सांगितले. “मृत व्यक्ती बऱ्याच काळापासून आजारी होती. पत्नीवर मुलगा आणि पती दोघांच्या देखभालीची जबाबदारी होती. लॉकडाऊन होण्याआधी पत्नी काही कामासाठी मुंबईला गेली होती. ती तिथेच अडकली” असे पोलिसांनी सांगितले. मृत्यू होण्याआधी वृद्ध व्यक्तीने मुलीला फोन करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.