Video : CM ममतांनी बाजारात आखले कोरोनाचे रिंगण

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने   मंगळवारपासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. पुढील तीन आठवडे घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सोशल डिस्टनसिंगच्या माध्यमातूनच आपण या विषाणूला रोखू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितले आहे. मोदींच्या या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे.  


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील राज्यातील जनतेला सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  मोदींनी दिलेला संदेश तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी खुद्द कोलकाताच्या भाजी मार्केटमध्ये जात विशेष खबरदारी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. एनएनआयने ममता बॅनर्जींचा कोलकाता बाजारातील रस्त्यावर उतरुन सूचना देताना व्हिडिओ शेअर केलाय. 


या व्हिडिओमध्ये  ममता बॅनर्जी वीट हातात घेऊन रस्त्यावर सर्कल आखून भाजीपाला वैगेरे  वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सूचना करताना दिसत आहेत. भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या नागरिकांना अंतर ठेवून कसे उभे करायचे यासंदर्भात त्या माहिती देताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.  
देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर कोणीही घराबाहेर पडू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. कोरोनावर कोणतीही लस नसल्यामुळे सोशल डिस्टंनसिंग हाच यावरचा उपाय आहे, यावरही मोदींनी भर दिला होता. मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळताना दिसत आहे.  


देशात लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या घोषनेनंतर अनेकांनी बाजारात सामना खरेदीसाठी गर्दी केल्याचेही पाहायला मिळाले. गर्दी न करता विशेष खबरदारी घेऊन जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही सुरु ठेवण्यासंदर्भात ममता बॅनर्जींनी खुद्द जाऊन मार्गदर्शन केले.