अतिरिक्त प्रवास भाडे घेणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई होणार


मुंबई- राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांनी पुणे तसेच मुंबईहून आपापल्या घरी जाण्यास सुरुवात केली आहे. याचा गैरफायदा घेऊन काही ट्रॅव्हल्स चालकांकडून अवाचेसवा भाडे आकारण्यात येत आहे. अशा खासगी बस चालकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी दिले. प्रवाशांच्या सोयीसाठी जेथे अधिक बसेस सोडण्याची आवश्यकता आहे तेथे त्वरित कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खाजगी बसेसकडून जर अधिकचे प्रवास भाडे घेण्यात येत असेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देखील परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. खासगी बस सेवांनी सामाजिक बांधीलकीतून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करून सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.