मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यातील आदिवासी आश्रमशाळांना अपात्र पुरवठादाराकडून दुधाचा पुरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे. आश्रम शाळांमधील मुलांना पोषण आहारा अंतर्गत टेट्रापॅकिंगचे सुगंधी दूध देण्यात येत आहे. त्यासाठी ज्या दूध डेअऱ्या किंवा पुरवठादाराकडून दूध खरेदी केले जाते त्यांच्याकडे स्वतःचा सुगंधी दूध टेट्रापॅकिंग प्रकल्प असावा अशी टेंडर प्रक्रियेत अट होती. मात्र नाशिक विभागात दूध पुरवठ्याचा ठेका मिळालेल्या विश्वभारती फूड्स प्रायव्हेट लिमिटेडकडे पॅकिंग प्रकल्प नाही. त्यामुळे टेंडर प्रक्रियेतील अटी व शर्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत आदिवासी विकास आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे.
राज्यात ५२८ आदिवासी आश्रम शाळांमध्ये दोन लाखांहून अधिक मुले आहेत. त्यांना पोषण आहारा अंतर्गत दररोज दोनशे मिली सुगंधी दूध देण्याचा निर्णय २०१८मध्ये आदिवासी विभागाने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर सुगंधी दुधाच्या खरेदीसाठी ५ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन निविदा काढल्या होत्या. त्यात पुरवठादार डेअरी किंवा संस्थेचा स्वत:चा टेट्रापॅकिंग प्रकल्प असावा अशी अट होती. त्यानुसार पराग डेअरीला १८ हजार लिटर दूध पुरवण्याचा ठेका मिळाला आहे. महानंदला पाच हजार, वारणा डेअरीला चार हजार तर विश्वभारती फूड्सला नऊ हजार लिटर दूध पुरवण्याचा ठेका मिळाला आहे. असे असतानाही विश्वभारती फुड्सकडे मात्र स्वत:चा पॅकिंग प्रकल्प नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी चौकशी सुरू केली असून त्याची सुनावणी नुकतीच झाली आहे.