ठाणे शहरात बुधवारी सायंकाळी कोरोना विषाणूची लागण झालेला एक नवा रुग्ण आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णाने खासगी लॅबमध्ये आपली चाचणी केली होती. या चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. परंतु, ही बाब त्यांनी लपवून ठेवल्याचे सांगण्यात येते. परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी या रुग्णाला नव्हती. कोरोनाची लागण होऊनही या व्यक्तीने दक्षता पाळली नसल्याचे बोलले जाते. महापालिका प्रशासनाने यामुळे घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या सोसायटीचे निर्जंतुकीकरण केले जात असून लॅबचीही चौकशी सुरु असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठाण्यातील या रुग्णावर आता मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात ९ जण आले होते. त्यांचीही तपासणी केली जात आहे. त्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या व्यक्तीने योग्यवेळी सरकारी रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक होते.
दरम्यान, नवी मुंबईतील वाशी येथे एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे वय ६५ वर्षे इतके होते. गेल्या काही दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरु होते. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.