ठाणे: मुंबईतील कोर्टातून ठाणे कारागृहात परत आणताना कुटुंबीयांनी दिलेलं घरचं जेवण घेऊ दिलं नाही म्हणून कच्चा कैद्यानं व्हॅनमध्येच पोलिसांवर हल्ला चढवला. ठाण्याजवळील नौपाडा येथे पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. यासंदर्भात पोलिसांनीच माहिती दिली.
मोहम्मद सोहेल शौकत अली असं या आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी व्हॅनमधून दिंडोशी कोर्टात नेले होते. ठाणे कारागृहात परतताना नौपाडाजवळील पेट्रोल पंपाजवळ त्यानं पोलिसांवरच हल्ला चढवला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अली याला कोर्टात नेण्यात येत होतं. त्याच्यासोबत व्हॅनमध्ये अन्य ११ कच्चे कैदी होते. सुनावणीनंतर अलीचा एक नातेवाइक कोर्टाबाहेर त्याला घरचं जेवण देण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी व्हॅनमधील पोलिसांनी घरचं जेवण देण्यास नकार दिला. त्यावर अलीनं पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसंच एका कर्मचाऱ्यावर थुंकला आणि धक्काबुक्की केली. एका पोलिसाच्या हाताच्या बोटाला त्यानं चावा घेतला, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
घरचं जेवण दिलं नाही; कैद्याचा व्हॅनमध्येच पोलिसांवर हल्ला
व्हॅनमधील जाळीवर त्यानं स्वतःचं डोकंही आपटलं. यात त्याच्या डोक्याला जखमा झाल्या. यानंतर पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं. तपासणीनंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी अलीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.