कर्तव्यावर रूजू होण्यास चालढकल करणारे सात पोलीस निलंबित

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा महिन्यांपासून गैरहजर असलेल्या सात पोलीस कर्मचाऱ्यांना आज(बुधवार) पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.


सध्या करोना विषाणूने थैमान घातले असून देशभरातील पोलीस कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत.   मात्र एवढी गंभीर  परिस्थिती असूनही व या सात पोलीस कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही ते कर्तव्यावर रुजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे, असे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले आहे.



करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. तर सरकारच्या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून राज्यभरातील पोलीस कर्मचारी निष्ठेने कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्याचे पालन करण्यास चालढकल करत असून सहा महिन्यांपासून गैरहजर राहत असल्याचे दिसून आले आहे.


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तीन हजार पोलीस कर्मचारी असून यातील अनेकजण अधिकृत सुट्टी, वैद्यकीय कारणास्तव रजेवर आहेत. परंतु, अवघ्या देशातील पोलीस कर्मचारी करोनाशी दोन हात करत असताना  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील  सात पोलीस कर्मचारी हे गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर आहेत. त्यांना करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तल्याकडून वारंवार हजर राहण्यास सांगण्यात आले होते.  मात्र त्यांनी विविध कारणे देत कर्तव्यावर रूजू  होण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आज पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी थेट त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. झोन एक आणि झोन दोन मधील एकूण ७ पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.