पुण्यात दोन तासांत 3 आयुष्य संपले, आणखी 12 कोरोनाबाधित आढळले

महाराष्ट्रासमोर उभे ठाकले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस रौद्ररुपधारण करत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्याला कोरोनाला मोठा विळखा बसला आहे. याचे आज भयावह चित्र पुण्यात पाहण्यास मिळाले. अवघ्या 2 तासांत 3 जणांचे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 12 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.


पुण्यात आज सकाळी दोन तासातच 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे  शहरात एकच खळबळ उडाली आहे. या तिन्ही रुग्णांचे वय हे 60 वर्षांपुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. कोरोनामुळे पुण्यात झालेल्या मृतांचा आकडा आता 8 झाला आहे.  तर दिवसभरात 12 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पुण्यावरच कोरोनाच संकट गडद होत चाललं आहे.


खबरदारी म्हणून पुण्यातील पूर्व भाग आजपासून सील करण्यात आला आहे.  कोंढवा, महर्षी नगर ते आरटीओ या भागातील पेठा या 7 दिवस बंद राहणार आहे. या भागातील नागरिकांनी बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील महत्वाचे रस्ते बंद केले आहे.