मुंबईसाठी धोक्याची घंटा, धारावीमधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला


मुंबई: कोरोना व्हायरसचा मुंबईभोवतीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कारण आधी परदेशातून आलेल्या नागरिकांपुरता पर्यांदित असलेल्या या व्हायरसने झोपडपट्ट्यांमध्येही शिरकाव केला असून धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. धारावीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे.


धारावीमध्ये आता नव्याने कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून हे दोन्ही रुग्ण धारावीतील बलिगा नगरमधील असल्याची माहिती आहे. याधी जी महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती, तेच 80 वर्षांचे वडील आणि 49 वर्षांचा भाऊ या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.


धारावीमध्ये आता सापडलेल्या दोन रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे. यामध्ये बलिदान नगरमधील 4, वैभव अपार्टमेंटमध्ये 1 डॉक्टर, मुकुंद नगरमध्ये 49 वर्षाचा एक पुरुष आणि मदिना नगरमध्ये 21 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे.


दरम्यान, कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा आज घेतला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅबिनेट मंत्री समवेत चर्चा करणार आहेत. काही कॅबिनेट मंत्री मुंबई बाहेर आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत.मुंबईसह महाराष्ट्रात कोव्हीड-19 रूग्ण वाढत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवावं यासाठी सरकार प्रयत्न करत असून आज याच विषयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे आजच्या चर्चेनंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही मोठा निर्णय घेण्यात येतो का, हे पाहावं लागेल.