कोरोनाचे रुग्ण शोधणं झालं सोपं; या टेस्ट किटला भारताने दिली मान्यता

मुंबई : Coronavirus च्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त संशयित रुग्णांच्या चाचण्या होणं आवश्यक आहे. आपल्याकडे चाचणी करणाऱ्या लॅबची संख्या आणि सापडणारे रुग्ण यांचं प्रमाण व्यस्त आहे. यावर उपाय म्हणून अँटिबॉडी टिटेक्शन चाचणीला सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे या चाचणीतून क्षणात समजू शकतं.


श्वसनाचा आजार असणाऱ्या किंवा Covid-19 ची लक्षणं जाणवणाऱ्या कुणालाही ही चाचणी केल्यानंतर लागण झाली आहे की नाही हे क्षणात कळू शकेल. या टेस्ट किटला पुण्याच्या NIV आणि दिल्लीच्या ICMR या दोन्ही केंद्रीय संस्थांनी परवानगी दिली आहे.


HLL Lifecare Limited या सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या संशोधन संस्थेने ही किट विकसित केली आहे. यामुळे आता स्वॅब टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत कोरोनाग्रस्ताचं आयसोलेशन थांबणार नाही. त्याऐवजी त्वरित त्याला रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार सुरू करता येतील.Covid-19 ची लागण झाली आहे की नाही, याची खात्रीशीर चाचणी रुग्णाच्या घशातल्या द्रावावरूनच होते. पण ही स्वॅब टेस्ट करण्यास वेळ जातो. त्याऐवजी या चाचणीने किमान प्राथमिक टप्प्यावर कोरोना संशयित रुग्णांचं अलगीकरण करणं सोयीचं होणार आहे.